फ्रेशर्सना नोकरी मिळविताना सीव्ही महत्वाचा दस्तावेज असतो. त्यामुळे सीव्हीमध्ये कोणत्या गोष्टींचा उल्लेख असावा तसेच सीव्ही बनवताना आणि प्रत्यक्ष मुलाखत देताना फ्रेशर्सनी काय काळजी घ्यायला हवी याची माहिती घेऊया.
हायलाइट्स:
- फ्रेशर्सना नोकरी मिळविणे होईल सोपे
- सीव्हीमध्ये महत्वाच्या बाबींचा उल्लेख करा
- खोटी माहिती लिहू नका, आत्मविश्वासाने बोला
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वजण नोकरीच्या शोधात बाहेर पडतात. कामाचा अनुभव असलेल्यांना नोकरी मिळताना अडचणी येत नाहीत. पण फ्रेशर्सना नोकरीसाठी खूप प्रयत्न करावे लागतात. अशावेळी उमेदवारांचा सीव्ही म्हणजेच करिक्युलम विटा महत्वाचा ठरतो. यामध्ये तुमची शैक्षणिक माहिती दिलेली असते. तुम्ही विद्यार्थी असाल आणि नोकरी शोधत असाल तर एक चांगला सीव्ही तुम्हाला चांगली नोकरी देऊ शकतो. याऊलट सीव्ही चांगला नसल्यास तुम्हाला संधी गमवावी लागू शकते.
त्यामुळे फ्रेशर्सचा सीव्ही कसा असावा तसेच फ्रेशर्सनी सीव्ही बनवताना, मुलाखत देताना काय काळजी घ्यायला हवी याची माहिती घेऊया.चांगले सीव्ही फॉरमॅट लिहिणे खूप सोपे आहे, तुम्हाला फक्त मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे असलेल्या कौशल्यांचा उल्लेख करणे अत्यंत आवश्यक आहे. गुगलची मदत घेऊन तुम्ही फ्रेशर्ससाठी सोपे फॉर्मेट पाहू शकता. त्यात पुढील माहिती आवर्जुन भरा.
फ्रेशर्सनी असा बनवा सीव्ही
हेडरवर तुमचे नाव, माहिती, मोबाइल नंबर, ईमेल असा तपशील द्या.
प्रोफाइल सारांशमध्ये तुमच्याबद्दल, शैक्षणिक पार्श्वभूमी, तुमच्याकडील कौशल्य, तुमच्या आवडी निवडी यांची संक्षिप्त माहिती द्या तुमच्या शैक्षणिक माहितीचा सविस्तर उल्लेख असू द्या. इयत्ता, टक्केवारी, शाळा, कॉलेज किंवा विद्यापीठाचे नाव, स्ट्रीम, पास झाल्याचे वर्ष हा तपशील सीव्हीमध्ये असावा.तुमच्याकडे शिक्षणाव्यतिरिक्त तंत्रज्ञानस लिखाण असे काही कौशल्य असल्यास नमूद करा.
शिक्षण घेताना कुठे इंटर्नशीप केली असेल तर त्याचा उल्लेख करा. तुम्ही कोणता वेगळा प्रोजेक्ट केला असेल तर त्याची माहिती द्या. तुमची स्ट्रेंथ, येत असलेल्या भाषा यांचा उल्लेख करा.
सीव्ही बनवताना आणि मुलाखतीला जाण्याआधी पुढील बाबी लक्षात ठेवा.
तुम्ही दिलेल्या सीव्हीच्या आधारे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुम्ही सीव्हीमध्ये लिहिलेल्या माहितीची घरी उजळणी करा. त्याबद्दल आत्मविश्वासाने बोला.
तुमच्याकडे कामाचा अनुभव नाही. त्यामुळे आतापर्यंतचे शिक्षण आणि विषय मांडण्याची पद्धत ही तुम्हाला नोकरी मिळवून देणार आहे हे लक्षात ठेवा.
काम पूर्ण करण्यासाठी गरज असेल तर प्रवास करण्याची, संवाद कौशल्याची गरज असते. त्यामुळे याचा स्पष्ट उल्लेख तुमच्या सीव्हीमध्ये असावा. तशी तुमची तयारी देखील असावी.
तुम्ही टीमसोबत मिळून चांगले काम करु शकता याची माहिती द्या.
तुम्ही नोकरीच्या पहिल्या पायरीवर आहात. म्हणजेच तुम्ही प्रशिक्षणार्थी आहात. त्यामुळे प्रत्येक नवीन गोष्ट शिकण्याची तयारी ठेवा.